पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने पीएमपीएमएल प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पीएमपी बससेवेच्या बसथांब्यांचे रूप आता पालटणार असून, लवकरच शहरात २०० अत्याधुनिक बस शेल्टर उभारले जाणार आहेत. यातील ५० शेल्टर मुंबईतील ‘बेस्ट’ बससेवेच्या धर्तीवर विकसित केले जाणार आहेत.

बसची वाट पाहताना प्रवाशांना उन्हा-पावसाचा त्रास सहन करावा लागू नये आणि त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. या नवीन बस शेल्टरमध्ये प्रवाशांसाठी आरामदायी आसनव्यवस्था, मोबाईल चार्जिंगची सुविधा आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे महिला प्रवाशांसह सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये मोठी भर पडणार आहे.

या नवीन थांब्यांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘रिअल-टाइम’ माहिती देणारे डिजिटल डिस्प्ले फलक हे असणार आहे. या फलकांवरून कोणत्या मार्गावरील बस कधी येईल आणि ती पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, याची अचूक माहिती प्रवाशांना मिळणार आहे.
सध्या पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्वाधिक गर्दी असलेल्या २०० बसथांब्यांची निवड करण्यात आली आहे. तरी उर्वरित थांब्यांचे नूतनीकरणही पुढील टप्प्यांत टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. प्रशासनाने या प्रकल्पाचे काम आगामी ४ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.







