पुण्यात (Pune) अनैतिक संबंधातून होणाऱ्या खुनाच्या घटनेत वाढ होतांना दिसत आहे. दरम्यान, हडपसर भागातील अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हडपसर भागात अनैतिक संबंधातून पतीची पत्नी आणि तिच्या प्रियकराने हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सिद्धेश्वर बंडू भिसे असे मृत पतीचे नाव आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची हत्या करून पत्नी आणि तिच्या प्रियकराने हत्यानंतर मृतदेह पोत्यात घालून 55 किलोमीटर दूर नेत नदीत फेकून मृतदेहाची विल्हेवाट केली होती. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर आरोपी योगिता सिद्धेश्वर भिसे आणि शिवाजी सुतार यांना राजगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. एक दिवस रात्री नवरा घरात झोपलेला असताना प्रियकर अचानक भेटण्यासाठी महिलेच्या घरी गेला. आवाज आल्याने पतीला जाग आली, दरम्यान, पतीने उठून पाहिल्यावर त्याची पत्नी परपुरुषासोबत दिसली. महिलेला रंगेहात पकडल्यानंतर पती पत्नीत जोरदार भांडण झाले. याच भांडणात पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केली. हत्येनंतर रात्री दीडच्या सुमारास स्कुटरवर मृतदेह सारोळ्याला घेऊन जाऊन नदीत फेकला. पोलिसांना हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि आरोपींना अटक केली.








