पिंपरी : पिंपरीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच विवाहितेने आणि तिच्या बहिणीने त्याचा छळ केला. या त्रासाला कंटाळून पतीने टोकाच पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली.
नारायण मधुकर निर्वळ (वय ३५), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ (३९, रा. सोमठाणा, ता. मानवत, जि. परभणी) यांनी याप्रकरणी (दि. २०) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी आणि तिची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली.
नारायण निर्वळ हे अॅनिमेशन क्षेत्रात कार्यरत होते. काही मित्रांसोबत मिळून ते एका कार्यालयातून ते व्यवसाय करीत होते. त्यांच्या पत्नीला देखील काही दिवसांपूर्वी ‘वर्क फ्रॉम’ मिळाले होते. दरम्यान, नारायण यांची पत्नी आणि तिची बहीण यांनी नारायण यांच्याकडे दारू पिण्यास पैशांची मागणी केली. तसेच नारायण यांच्याशी वारंवार भांडणे करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला.
या त्रासाला कंटाळून नारायण यांनी १७ जानेवारी रोजी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. नारायण यांनी मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याबाबत भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना फोनवरून मेसेज केले होते. त्यावरून ज्ञानेश्वर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नारायण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.