पुणे : पुण्यातील कात्रज परिसरात वडापाव देण्याच्या बहाण्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ओळखीच्या असलेल्या महिलेने एका १९ वर्षीय मुलीला वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने घरी नेले. पती घरात असताना तरुणीला घरात सोडून महिला बाहेरून दाराची कडी लावून निघून गेली.
यावेळी महिलेच्या पतीने तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार बुधवारी ३ एप्रिल दुपारी दोन ते रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरात घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पीडित १९ वर्षीय मुलीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रल्हाद सखाराम साळुंके (४८, रा. कात्रज) आणि त्याची पत्नीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपी महिला हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडित तरुणी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भाजी मंडई येथे चालत जात होती. त्यावेळी तिच्या ओळखीची आरोपी महिला तिला भेटली. यावेळी तिने तरुणीला गोड बोलून तिच्या राहत्या घरी घेऊन गेली. तरुणीला वडापाव देण्याचा बहाणा करुन तिला एकटीला घरात ठेवून बाहेर निघून गेली.
घरात पती आहे हे माहित असताना देखील महिलेने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून महिलेच्या पतीने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, याप्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पतीच्या या कृत्याला त्याच्या पत्नीने मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.