पुणे : पुण्यातील चंदननगर येथील चव्हाण नगर परिसरात एक अघोरी प्रकार समोर आला आहे. जादूटोणा आणि अघोरी विद्या करून जन्मापासून मानसिकरित्या दुर्बल आणि आजारी असलेल्या मुलाला बरे करण्यासाठी आधीच ३५ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर आणखी ५० लाख रुपये आणि नरबळी द्या, अन्यथा पती आणि मुलाचा मृत्यू होईल असं म्हणत भीती घालणाऱ्या मांत्रिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४ जणांविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारुदत्त संजय मारणे ( वय ३१, निपाणी वस्ती आंबेगाव), पुनम घनश्याम कोहंडे (वय ३८, कर्वे नगर), नीलम राहुल जाधव (वय ३५, कर्वेनगर), देविका अमित जुन्नलकर (वय ३०, उत्सव मंगल कार्यालयामागे कोथरूड) आणि संतोष मारुती येनपुरे (वय ४५, राग गणेश पुरी सोसायटी वारजे माळवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ४० वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा जन्मापासून मानसिकरित्या दुर्बल आणि आजारी आहे. आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांच्या मुलाची आजारपणातून सुटका करू आणि घरातील अडीअडचणी जादूटोण्याच्या साह्याने सोडवू असं म्हणत फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जादूटोणा करून मंत्राच्या आणि भूतपिषाच्या सहाय्याने मुलाला बरे करतो असं म्हणत फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी ३५ लाख रुपये घेतले. २०१६ पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता.
दरम्यान गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आरोपींनी फिर्यादी यांच्याशी पुन्हा संपर्क साधला आणि आणखी पन्नास लाख रुपयांची मागणी केली. तसेच एक नरबळी द्यावा लागेल असंही त्यांनी सांगितलं. असं नाही केलं तर तुमच्या मुलाचा आणि पतीचा मृत्यू होईल, घराचा नायनाट होईल अशी भीती घातली. या सर्व प्रकाराला घाबरून फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.