लोणी काळभोर (पुणे): हवेली तालुक्यातील थेऊर तलाठी व सर्कलच्या कारनाम्यांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. एकामागून एक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा थेऊर सर्कलने एका शेतकऱ्याची नोंद रद्द केल्याची घटना घडली आहे. यामुळे थेऊर सर्कलच्या कारभाराचे दिवसागणिक वाभाडे निघत आहेत.
थेऊर येथील गट नबंर १८९ मधील एका शेतकऱ्याने त्याच गटातील दुसऱ्या शेतकऱ्याचे संपूर्ण क्षेत्र खरेदी केले, तरीही त्या फेरफारची नोंद रद्द झाली आहे. विशेष म्हणजे त्या शेतकऱ्याची त्याच गटात मालकी हक्कांत अगोदरच जमीन मिळकत आहे, तरीही त्यांची फेरफार नोंद थेऊर सर्कल जयश्री कवडे यांनी रद्द केली आहे. त्यांच्या प्रोटोकॉल कारभारामुळे महसूलच्या नियमांची पायमल्ली होऊ लागली आहे. यामुळे “थेऊर सर्कल दळतंय आणि वरिष्ठ कार्यालय पीठ खातंय” अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे.
सदर शेतकऱ्याची नोंद रद्द करताना ‘प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण’ असा शेरा मारलेला आहे. मात्र, मुळातच लिहून देणार यांनी त्यांच्या नावावरील संपूर्ण एक आर मालकी हक्कांतील क्षेत्र यांचा व्यवहार केला आहे. तरीही सर्कल कवडे यांनी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या शासकीय कर्तव्याबाबतच शेतकरी शंका घेऊ लागले आहेत.
जर नावावर एकच गुंठा क्षेत्र असेल व तेही मालकी हक्कांत असेल, त्याचा ‘संपूर्ण विक्री व्यवहार’ झाला असेल व ते खरेदी करणारा त्याच गटातील धारक शेतकरी असेल तर तो व्यवहार नियमित असतो, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही. मात्र, तरीही केवळ ‘प्रोटोकॉल’ च्या नावाखाली महसूलचे नवनवीन नियम तयार करण्याचा वेगळा फंडा थेऊर सर्कल कार्यालयाने सुरु केला आहे.
“थेऊर सर्कलला थेऊर तलाठ्यांची साथ”
याबाबत थेऊर येथील शेतकऱ्याने सांगितले की, गट नंबर १८९ मध्ये माझ्या आईच्या नावे मालकी हक्कांत क्षेत्र आहे. त्याच गटात चुलत भावाचे एक आर क्षेत्र आहे. आईने त्याच गटातील संपूर्ण एक आर क्षेत्र ७ सप्टेंबरला नोंदणीकृत ई फेरफार अन्वये खरेदी केले. त्याची फेरफार नोंद थेऊर तलाठ्याने विलंबाने म्हणजे २७ सप्टेंबरला घेतली. यासाठी तलाठी कार्यालयात अनेकदा खेटे मारायला लागले. मात्र, तलाठी सरला पाटील यांनी सांगितले की, तुकड्यांतील गुंठेवारीची नोंद असल्याने मी घेणार नाही. संबंधित शेतकऱ्याने ही नोंद संपूर्ण क्षेत्र खरेदी असून खरेदी घेणार त्याच गटातील अगोदरच मालकी हक्कांत आहेत. ही नोंद तुकड्यातील नाही, हे वारंवार सांगूनही तलाठी पाटील यांनी फेरफार क्रमांक ६५८४ अन्वये नोंद विलंबाने घेतली.
तब्बल वीस दिवसांच्या विलंबाने थेऊर तलाठी पाटील यांनी ही नोंद घेतली, हे नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन दिसत आहे. तरीही संबंधित तलाठ्याची साधी चौकशीही होत नसल्याने महसूलची प्रतिमा मलीन होत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी तलाठी पाटील यांचा शेतकऱ्याच्या नियमित नोंदीसाठी तीस हजार रुपये स्वतः व सर्कलसाठी मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यामुळे थेऊर सर्कलच्या विविध क्लुप्त्यांना खतपाणी घालण्याचे काम तलाठी सरला पाटील करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
… तर, मोबाईल नंबर करतात ब्लॉक
जर सर्वसामान्य नागरिक किंवा शेतकऱ्याने आपल्या समस्यांबाबत तलाठी, सर्कल, तहसील आणि प्रांत यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा केला तर त्यांना कोणतेही उत्तर मिळत नाही. उलट फोन करणाऱ्या व्यक्तीचा नंबर त्वरित ब्लॉक केला जात असल्याचे समोर आले आहे.
सदर प्रकरणाविषयी हवेली प्रांत कार्यालयीन नायब तहसीलदार नथाजी सगट यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
“पुणे प्राईम न्यूज चे नागरिकांना आवाहन “
नागरिकांनो घाबरु नका, शासकीय अधिकारी हे लोकसेवक आहेत. त्यांच्याकडून कामात अडवणूक होतेय, प्रोटोकॉलसाठी प्रकरण वेठीस ठेवले जाते, हेलपाटे मारावे लागतात, चला तर मग आपली समस्या निर्भिडपणे पुणे प्राईम न्यूज ला सांगा. आम्ही आपले नाव गुप्त ठेवून आपल्या समस्येला प्रकाशित करुन प्रशासन व जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करु, त्यासाठी पुणे प्राईम न्यूज च्या ई मेल आयडी वर संपर्क साधा.