लोणी काळभोर, ता.20 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नायगाव फाटा येथे वाहतूक कोंडी प्रचंड झाली असून वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. एकीकडे नागरिक तासनतास वाहतूक कोंडीत अडकून मनस्ताप सहन करीत आहे. तर दुसरीकडे वाहतूक पोलिस वाहतूक नियमन करण्याऐवजी वसुली करण्यास दंग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लेनवर रविवारी सहा वाजण्याच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे थेऊर फाटा ते नायगाव फाटा व पुढे सोरतापवाडी पर्यटन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. मात्र, सध्या वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी ऑनलाईन दंड व पावत्या फाडण्यात दंग आहेत. त्यामुळे सोलापूर, लातूर, दौंड, यवत, इंदापूर परिसरातून येणाऱ्या दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहने येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. चौकाचौकात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याऐवजी ते ये-जा करणारे शेतकरी, नोकरदार व सर्वसामान्य नागरिकांकडून पठाणी वसुली करीत असल्याच्या तक्रारी येत असून वाहतूक विभागातील पोलिसांचे काम वाहतूक नियमन की वसुली असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.
दुसरीकडे सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी वाहनांचा फोटो काढून मोठा दंड आकारत आहेत. प्रसंगी अनेक वाहनधारकांना हुज्जत घालून अपमानीत करत आहेत. विशेष म्हणजे यात अनेक वाहनधारकांची कुठलीही चूक नसताना हा आर्थिक फटका त्यांना नाहक सहन करावा लागत आहे. रस्त्यावर एका बाजूला उभे राहून वाहतूक पोलीस सर्वसाधारण वाहनधारकांना हेरुन ते समोर जाताच अचानक त्यांच्या वाहनाचा फोटो काढून मोठा दंड आकारतात असा अनुभव सध्या अनेकांना दररोज येत असल्याचा तक्रारी आहेत.
दरम्यान, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दैनंदिन छोटे मोठे अपघात होत असतात. रस्त्याची दुरवस्था व वाहतूक कोंडी याचा अगोदरच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच वाहतूक पोलिसांनी वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली वाहतूक नियमनाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वाहतूक पोलिस व त्यांचे वरिष्ठ अधिकारी जागे होणार का? व या ‘वसूली’ कर्मचाऱ्यावर प्रशासनाच्या वतीने काय कारवाई होणार ? याकडे सामान्य पुणेकरांचे लक्ष लागले आहे.