अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शिरूर तहसील कार्यालयाच्या वतीने जी मदत लागेल ती मदत देणार असून शासकीय योजनांचा लाभ त्यांना कसा मिळेल यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले. दिव्यांग्यासाठी घेण्यात आलेल्या या महाराजस्व अभियानास मोठा प्रतिसाद मिळाला व मोठ्या प्रमाणात दिव्यांगांच्या विविध प्रश्नांचे निराकरण केले.
महसूल पंधरवडा निमित्त एक हात मदतीचा दिव्यांगच्या कल्याणाचा अंतर्गत शिरूर येथे महाराजस्व अभियान शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय येथे राबविण्यात आले होते. यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, नायब तहसीलदार सुवर्णा सांगळे, प्रकाश मुसळे, सहाय्यक गटविकास अधिकारी महेश जगताप, महसूल विभागाचे अव्वल कारकून एन बी खोडस्कर, शिरूरचे मंडलधिकारी शरद सानप, मंडलाधिकारी प्रशांत शेटे, शिरूर तालुक्यातील सर्वच खात्याचे प्रमुख व शिरूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते.
शिरूर तालुक्यातील पंचायत समिती मार्फत दिव्यांग बांधवांना देण्यात येणारा निधी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले. सकाळी दहा वाजता एक हात मदतीचा हे महसूल खात्याचे अभियान सुरू झाले असून शिरूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आलेल्या दिव्यांग बांधवांनी रेशन कार्ड, एसटी प्रवासाबाबत संजय गांधी, दिव्यांग निधी, आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार कार्ड काढणे, सेतू केंद्रातील कामे तत्काळ करुन व विविध योजनांचे अर्ज यावेळी भरून घेण्यात आले आहेत.