पुणे : राज्यात आणखी एक आठवडा थंडीचा मुक्काम असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी असून, यामध्ये चढ-उतार होईल आणि ८ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट असणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वळगता इतर राज्यात पहाटेचं किमान तापमान सरासरी १४ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पुढील आठवड्यात शेकोटी, स्वेटर आणि इतर गोष्टींची थंडीपासून वाचण्यासाठी गरज भासणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यांत पहाटेचे व दुपारचे असे दोन्हीही किमान व कमाल तापमान सध्याच्या दिवसात असणाऱ्या सरासरी तापमानाइतके म्हणजे पहाटेचे किमान १४ व दुपारचे कमाल ३० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. खानदेश, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया अशा १४ जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान हे ८-१० डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा १-२ डिग्रीने कमी) तर दुपारचे कमाल तापमान २६ डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी पेक्षा २ डिग्रीने कमी) दरम्यानचे असू शकते.
पुढील आठवड्यात ३०, ३१ नंतर थंडी आणखी वाढू शकते. त्यामुळे हुडहुडी आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. थंड वाऱ्यांचा प्रभाव ८ तारखेपर्यंत असणार आहे. बाहेरच्या देशातून येणारी थंडीच्या लाटेचे परिणाम जाणवतील. साधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत अशीच थंडी कायम असणार आहे. त्यामुळे सकाळच्या वेळात काहीसे ढगाळ वातावरण असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
ढगाळ वातावरणामुळे पावसाची कोणती शक्यता नाही. काही जिल्ह्यांसह पुण्यात मागील आठवड्यात पार १० डिग्रीच्या खाली घसरला होता. मात्र, आता काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुणेकर सकाळच्या वेळी मॉर्निग वॉक करताना दिसत आहेत. तसेच तरुणाई रात्रीच्या शेकोटीचा आनंद घेताना विविध ठिकाणी दिसत आहे. मात्र, हे चित्र पुढील १५ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.