दीपक खिलारे
इंदापूर : यंदाच्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीत सुरु करण्यात आलेल्या पाणी टँकरचा मोबदला व विहीर अधिग्रहणाचे अनुदान अशा एकूण २ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीची दोन वेळा मागणी केली. मात्र, शासनाने अद्यापपर्यंत एक छदाम ही दिला नसल्याने उन्हाळ्यात पाजलेल्या पाण्याचे पैसे मिळायला किती उन्हाळे वाट पहावी लागेल असा प्रश्न इंदापूर पंचायत समितीसमोर उभा ठाकला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यात तालुक्यातील ३२ गावे व वाड्यावस्त्यांना ६७ टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. त्यासाठी ६ विहिरींचे अधिग्रहण करावे लागले. सुमारे ९० हजार लोक, ३१ हजार ४५४ गायी, म्हशी, ३५ हजार ११९ शेळ्या मेंढ्या आदि पशुधन या टँकरच्या पाण्यावर तगले.
दुष्काळ निभावून नेल्यानंतर टँकरचा मोबदला मिळावा यासाठी पंचायत समितीने प्रथमतः १ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली. त्यानंतर २ कोटी २० लाख अधिक विहीर अधिग्रहणाचे १० लाख असा एकूण २ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीची मागणी ४ जुलै रोजी करूनही निधी मिळाला नाही. पुन्हा १३ ऑगस्ट रोजी निधीची मागणी केली. मात्र, शासनाने अद्यापपर्यंत एक छदाम ही दिलेला नाही.
सन २०२४ मध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेल्या गावांची नावे : कळस, चाकाटी, पिठेवाडी, तरंगवाडी, निरनिमगाव, झगडेवाडी, व्याहाळी, निमगाव केतकी, वरकुटे बुद्रुक, कचरवाडी (बावडा), वरकुटे खुर्द, गलांडवाडी नं.२, सुरवड, बावडा, बोराटवाडी, लुमेवाडी, लाखेवाडी, वकीलवस्ती, निरवांगी, वायसेवाडी, अकोले, म्हसोबाची वाडी, भांडगाव, वडापूरी, कचरवाडी (निमगाव केतकी), रेडणी, गोखळी, सराटी, खोरोची, शेटफळगढे, लामजेवाडी, भोडणी.
पाणी टँकरचा मोबदला व विहीर अधिग्रहणाचे अनुदान रखडले आहे. ते मिळवण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. नजीकच्या काळात ते मिळेल अशी खात्री वाटते.
– सचिन खुडे, गटविकास अधिकारी, इंदापूर पंचायत समिती