चाकण : घरात सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत पथकाने दोन महिलांची सुटका करुन एकाला अटक केली आहे. शनिवारी (ता. ६) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथे करण्यात आली.
याबाबत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार मारुती महादेव करचुंडे (वय ३८) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन मोतीरामजी बोराडे (वय ३५, रा. फ्लॅट नं. ४०१, डी विंग, अविनाश प्राईड, मेदनकरवाडी, चाकण) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला मेदनकरवाडी येथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर याठिकाणी छापा टाकला. आरोपी पीडित दोन तरुणींकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याची माहिती या छाप्यात मिळाली.
दरम्यान, आरोपी दोन तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनुस मुलाणी करीत आहेत.