पुणे : हॉटेलमधील वेटरला मारहाण केल्याच्या रागातून हॉटेल चालकाने वाद केला. त्या झालेल्या वादातून दोघावर त्याच्याच कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री साडेअकरा वाजता मावळ तालुक्यातील इंदोरी बायपास येथील जयमल्हार हॉटेलसमोर घडली आहे.
प्रसाद उर्फ किरण अशोक पवार (वय 27, रा. कानेवाडी, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसाद याचा मित्र अभिषेक अशोक येवले (वय 31, रा. कानेवाडी, ता. मावळ) हा गंभीर जखमी झाला आहे. अक्षय दत्तात्रय येवले (वय 30, रा. कुंडमळा, ता. मावळ) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी हद्दीत असणाऱ्या इंदोरी बायापासलगत असणाऱ्या हॉटेल जय मल्हार येथे मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास प्रसाद पवार आणि त्याचा मित्र अभिषेक येवले हे आले होते. कोणत्यातरी कारणावरून त्यांनी या हॉटेलमधील वेटरला मारहाण केली. वेटर ने हॉटेल मालक अक्षयला फोन केला. प्रसाद आणि अभिषेक दोघे ही हॉटेल मालकाचे मित्र असल्याने त्यांनी भांडण करू नका, मी तिकडे येत आहे. असं सांगितलं. फोनवरच दोघांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ केली. मग तिथून दोघे ही निघून गेले. रात्री साडे अकरा वाजता प्रसाद व अभिषेक हे कोयता घेऊन हॉटेल जवळ पुन्हा आले. त्यावेळी अक्षय हॉटेल बंद करून त्यांची वाट बघत थांबला होता. अक्षय आणि त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी अक्षयने त्यांच्या हातातील कोयता घेऊन दोघांनाही गंभीर जखमी केले. त्यावेळी प्रसाद व अभिषेक यांना उपचारासाठी दाखल करण्यात केले. मात्र, त्यातील गंभीर जखमी झालेल्या प्रसादचा मृत्यू झाला. तर अभिषेक जखमी झाला आहे.
या प्रकरणी आरोपी हॉटेल मालक अक्षय येवले याला पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.