अमिन मुलाणी / सविंदणे : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील हॉटेल विसावाच्या मॅनेजरने एक लाख रुपये दिले नाही, म्हणून धारदार कोयत्याने मॅनेजरच्या डोक्यात हातावर जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड गावच्या हद्दीतील विसावा हॉटेल येथे घडली. याप्रकरणी फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत हरेश ठकाजी चोरे (वय- 45 वर्ष, हॉटेल मॅनेजर, रा. जांबुत, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी फरार आरोपी प्रशांत सारंगकर शिरसाठ (रा. ढोमेमळा, पिंपरखेड ता. शिरुर, जि. पुणे) या अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पिंपरखेड गावच्या हद्दीतील विसावा हॉटेल बिअर बार याठिकाणी प्रशांत शिरसाठ याने हॉटेल मॅनेजरकडे एक लाख रुपये मागीतले. मात्र, हॉटेल मॅनेजर हरेश चोरे यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे शिरसाठने हॉटेल मॅनेजर हरेशला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील कोयत्याने डाव्या हाताच्या कोपऱ्यावर व डोक्यात वार केले. याबाबत शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी फरार झाला होता.
दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी प्रशांत शिरसाठ हा आमदाबाद फाटा येथे असल्याबाबतची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाला आदेशित केले. या पथकाने आमदाबाद फाटा या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोसई दिलीप पवार, पोलीस हवालदार परशराम सांगळे, पोलीस अंमलदार निरज पिसाळ, विजय शिंदे, निखील रावडे, रघुनाथ हळनोर, नितेश थोरात यांच्या पथकाने केली आहे.