पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातून अभिलाषा मित्तल (वय -27) ही मुलगी आली होती. अभिलाषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 7 एप्रिल रोजी घडली होती. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल वसतिगृह चालकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी वसतिगृह चालकास पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. हे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी.राठोड यांनी दिले आहेत.
सुनिल परमेश्वर महानोर असे जमीन मंजूर झालेल्या वसतिगृह चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिलाषा मित्तल ही पुणे शहरात गुरुवार पेठ असणाऱ्या एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. खोलीचा दरवाजा आतून बंद करुन तिने गळफास घेतला होता. या प्रकरणात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्या तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. यामुळे संशय निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला. आणि डिपॉझिटचे पैसे मागितले म्हणून वसतिगृह चालकाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी आरोपी सुनील महानोर याला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.
सदर गुन्ह्यात अटक असलेला आरोपी सुनिल महानोर याने अॅड.गणेश माने यांच्यामार्फत पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या खटल्यात अॅड.गणेश माने यांनी न्यायालयास दाखवून दिले कि, या गुन्ह्यात आरोपी सुनिल महानोर याचा कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध दिसून येत नाही. व सदर गुन्ह्यात लावलेली कलमे आरोपीविरुद्ध लागू होत नाहीत. तसेच संपूर्ण केसच्या दाखल असलेल्या कागदपत्रांवरून सदर आरोपीने पीडितेस आत्महत्येस प्रवूत्त केल्याचे दिसून येत नाही यांसह इतर अनेक न्यायिक मुद्द्यांवर आरोपीच्या बाजूने युक्तिवाद केला.
दरम्यान, अॅड.गणेश माने यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. हे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.बी.राठोड यांनी दिले आहेत. तर या खटल्यात अॅड.गणेश माने यांना अॅड.धनंजय गलांडे व अॅड.उमेश मांजरे यांचे मोलाचे सहकार्य केले.