पुणे : घोड्यांवरून प्रवास करण्याची फार पूर्वीपासून असलेली परंपरा काळानुरूप नामशेष होत चालली आहे. मात्र अजूनही घोड्यांच्या शर्यती आणि मजा म्हणून नागरिक घोड्यावरून सवारी करतात. पण याच घोड्यांना इतिहास काळात महत्त्वपूर्ण स्थान होते. आजही अनेक भागांमध्ये टांगा वापरला जातो. लग्नातही काही ठिकाणी घोडा किंवा घोडी वापरण्याची परंपरा कायम आहे.
दरम्यान, अशाच एका शेतकऱ्याने जीवापाड जीव लावून सांभाळ केलेल्या घोड्याचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. इंदापूर तालुक्यातील अकोले गावातील निलेश अष्टेकर यांनी सांभाळ केलेल्या सिंकदर या घोड्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हि घटना १४ जून रोजी सकाळच्या सुमारास अकोले गावात घडली.
देशातीत उंच घोड्यांमध्ये ‘सिंकदर’चा नावलौकिक होता. सिंकदर हा ९ वर्षांचा होता. हा घोडा अष्टेकर फार्म येथे तबेल्यात राहत होता. अनेक रेकॉर्डमध्ये त्याचे नाव नोंदवले होते. सोशल मीडियावर या घोड्याच्या निधनाची माहिती आल्यानंतर परिसरातील नागरिकांनि हळहळ व्यक्त केली.
निलेश अष्टेकर म्हणले कि, माझ्या मते सिकंदर हा एक सुपरस्टार आणि शानदार घोडा होता. त्याचा पंजाबमध्ये जन्म झाला होता. ही आमच्या कुटुंबासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. सकाळी दहा वाजता अंत्यविधी करण्यात आला.