पुणे : पुण्यामधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कामावर जाणाऱ्या तरुणावर पहाटेच्या सुमारास काळाने घाला घातला आहे. पुणे-नगर महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीस्वार तरुण चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी दाखल करण्यासाठी घेऊन जात असता तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पुणे-नगर महामार्गावरील वाघोली परिसरात आज सकाळी अपघात घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमेश शिंदे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चैतन्य शिंदे हा खराडी येथे एका कंपनीत काम करत होता. नेहमीप्रमाणे चैतन्य हा आपल्या दुचाकीवर सकाळी साडे सहा वाजता खराडीतील कंपनीत जाण्यासाठी निघाला. दरम्यान घरापासून निघून काही वेळातच त्याचा अपघात झाला. पुणे-नगर महामार्गावर रिलायन्स मार्ट समोर डंपरने त्याला धडक दिली.
भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने तो खाली फेकला गेला आणि डंपरच्या मागील चाकाखाली आला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.