राहुलकुमार अवचट
यवत : गणेश उत्सव हा अनेक मंडळांचा फक्त गाण्याच्या तालावर नाचण्याचा प्रमुख भाग असतो. परंतु यवत गराडे वस्ती येथे प्रसिद्ध असलेला यवतचा राजा बाप्पा मोरया मित्र मंडळांनी अनेक मंडळांसमोर एक आदर्शवत उदाहरण देत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. यामुळे यवत परिसरात बप्पा मोरया मित्र मंडळ यांचे कौतुक होत आहे. गणेश उत्सव काळात १० दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला असून यामध्ये अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा व स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
गणेश उत्सव काळात मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, जनरल नॉलेज, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा तर महिलांसाठी संगीत खुर्ची व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या वतीने गणेश उत्सव काळात झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला.
बक्षीस वितरण समारंभासाठी कोणत्याही मान्यवरांना न बोलवता समाजासाठी काम करणारे पोलीस अधिकारी नारायण देशमुख, डॉ. चंद्रकांत चव्हाण, पत्रकार राहुलकुमार अवचट, विनायक दोरगे, संदीप भालेराव, ज्येष्ठ महिला रेणुका पवार, पुष्पा महाडिक, गयाबाई शिंदे यांसह हरित वारी फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व स्पर्धकांना सन्मान चिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी १० वी व १२ वीत पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. गणेश उत्सवानिमित्त झालेल्या या स्पर्धेत सुमारे ३१० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या १०३ स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन तर स्पर्धेत सहभागी घेतलेल्या उर्वरित २०७ स्पर्धकांना पदक ( मेडल ) देऊन सन्मानित करण्यात आले.
मंडळाच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी केल्या जात असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले या उपक्रमाचे यवत गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.