पुणे: गेल्या पाच वर्षात सुरुवातीच्या काळात निधी नसल्यामुळे भवन विभागातर्फे केले जाणारे बांधकाम रखडले होते. तर आता लिफ्टच्या जागेचे बांधकाम चुकीचे झालेले असल्यामुळे अजूनही लिफ्ट बसवली गेलेली नाही. शिवाजीनगर येथील होमी भाभा प्रसूती गृहाचे संथगतीने सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे (आप) पुणे महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे. तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रिया विषयी अधिकारी गंभीर नसल्याने आप कार्यकत्यांशी त्यांचा वाद झाला. भवन विभाग, विद्युत विभाग आणि आरोग्य विभाग यांच्यात समन्वय नसल्यामुळे अजूनही दोन मजले वापरात नाहीत. या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आपने केली आहे.
पुणे. शहराची लोकसंख्या प्रचंड असूनही तातडीच्या प्रसूतीच्या ऑपरेशनची सुविधा केवळ कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आहे. बऱ्याचदा तिथे जागा मिळणे अशक्य असते. तातडीच्या प्रसुतीसाठी त्यामुळे खासगी रुग्णालयामध्ये धाव घ्यावी लागते. गोखलेनगर, जनवाडी तसेच पाटील इस्टेट, वैदुवाडी या सर्वच भागातील गरीब महिलांना हा अडचणीचा भाग ठरतो आहे. त्यामुळे तातडीच्या प्रसूतीसाठीच्या सोयीसुविधा भाभा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
मोठ्या लोकसंख्येच्या पुणे शहरासाठी तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रियांसाठी केवळ एक हॉस्पिटल असणे, ही लाजिरवाणी बाब आहे. या भागातील माजी नगरसेवक, आमदार शिरोळे यांनी गेल्या पाच वर्षात या संदर्भात काहीही हालचाल केलेली नाही. दोन मजले अजूनही उपयोगात नसून तिथे पूर्ण सोयी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे. या वेळी आपचे सतीश यादव, अमोल मोरे, शंकर थोरात आदी उपस्थित होते.