उच्च रक्तदाबाचे कारणे :
उच्च रक्तदाबाचे अनेक कारणे आहेत.त्यापैकी रक्तातील सोडियमचे म्हणजेच मिठाचे प्रमाण वाढणे, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी असणे, प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले वजन, पुरेशी झोप न होणे, शारीरिक आणि मानसिक त्रास,सतत चिडचिड करणे, सिगारेट ओढणे , दारू चे व्यसन इत्यादि. नेहमी आढळून येणारी कारणे आहेत.
ह्यावर “फक्त घरी बनवलेले अन्न खाणे” हा अतिशय उत्तम आणि सोपा उपाय आहे.
उच्च रक्तदाबाचे प्रमुख दुष्परिणाम :
ह्दय, किडनी, डोळे , मेंदु ह्यासारख्या मुख्य अवयवांवर वाढलेल्या ब्लड प्रेशरचे दुष्परिणाम होवुन त्यांचे विकार होण्याची शक्यता वाढते.
काय पथ्य पाळावे :
ह्यापैकी जास्त मीठ म्हणजेच सोडियम ची मात्रा जास्त असलेले पदार्थ टाळणे आणि पोटॅशियमची मात्रा जास्त असलेले पदार्थ खाणे हे अतिशय महत्वाचे आहे.तसेच लघवीची मात्रा वाढवून शरीरातील सूज आणि सोडियम ची मात्रा कमी करणारे पदार्थही ह्यामध्ये उपयुक्त ठरतात. आपल्यापैकी बरेचसे उच्च रक्तदाबाचे रुग्ण मीठ कमी खातात परंतु ज्या पदार्थांमध्ये छुपे मीठ म्हणजेच हिडन सोडियम आहे,ते मात्र खात असतात जसे बेकारीचे पदार्थ, रेडी टू यूज पदार्थ, प्रोसेस केलेले पदार्थ,चिप्स,चीज,इत्यादी, तर हे पदार्थ टाळले पाहिजेत.
पोटॅशिअम जास्त असलेले पदार्थ जसे केळी, बटाटा, रताळी, सुरण, शिंगाडा, अरबी ,तसेच पावटा ,चवळी, मटकी, राजमा, सोयाबीन, डाळींमध्ये मुगडाळ आणि उडीद डाळ, ओला नारळ आणि नारळाचे पाणी,हिरव्या पालेभाज्या, कोहळा,वांगी, सर्व प्रकारच्या शेंगभाज्या, फ्लॉवर, सुक्या मेव्यामध्ये खारीक, मनुके , अंजीर हे पदार्थ नियमित खावे. तसेच लघवीचे प्रमाण वाढवून शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करणारे पदार्थ जसे नारळपाणी, लिंबूपाणी, कलिंगड, खरबूज, काकडी, टोमॅटो, पावटा, उसाचा रस हे ही खावे.
कलिंगड आणि बीटरूट ह्यामध्ये असलेल्या ‘नायट्रिक ऑक्साइड’ ह्या घटकामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते. हे कलिंगड आणि बीटरूट उच्च रक्तदाबाच्या रुग्णाना देवुन कितीतरी संशोंधन झालेले आहेत ज्यामध्ये ह्या पदार्थंच्या नियमित सेवनाने रक्तदाब नियंत्रणामध्ये आलेला आहे. तसेच कच्च्या भाज्या सॅलड च्या स्वरूपामध्ये खाव्यात. कवठ, लसूण खाण्याने पण चांगले परिणाम हॊतात. साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरावे.
उपयुक्त द्रव पदार्थ :
तसेच सोडा, कृत्रिम रंग आणि प्रीझरवेटीव वापरून तयार केलेले ज्यूस किंवा सॉफ्ट ड्रिंक्स न पिता नारळाचे पाणी, लिंबू पाणी, उसाचा रस, अननसचा ज्यूस, बीटरूटचा ज्यूस पिणे उच्च रक्तदाब कमी करतात.
काय टाळावे :
पदार्थ आळणी असेल तरी वरून मीठ घेऊ नये. खारवलेले शेंगदाणे,काजू,बदाम इत्यादी. रेडी टु यूज पदार्थ जसे नूडल्स, पास्ता, मॅगी, पॉपकॉर्न, कॅन आणि टिन मधील पदार्थ, प्रोसेस केलेले पदार्थ जसे चीज, बटर (ह्या ऐवजी घरी बनवलेले लोणी किंवा तूप खावे), प्रोसेस केलेले मांस म्हणजेच प्रोसेस्ड नॉनव्हेज पदार्थ, जॅम, जेली, सॉस सारखे पदार्थ, तसेच चिप्स, बाहेरचे तळलेले पदार्थ,(घरातील तळलेले पदार्थ कधीतरी खाल्ले तरी चालतील), पाव, ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्कीट सारखे बेकारीचे पदार्थ पूर्णपणे टाळावेत.
तसेच हिरव्या पालेभाज्यांमध्ये मिठाचे प्रमाण नैसर्गिकरीत्याच जास्त असल्यामुळे भाज्या शिजवताना त्यामध्ये मीठ टाकू नये, सैंधव मीठ वापरून केलेले घरी बनवलेले लोणचे, कुरडई चालेल. शक्यतो कॉफी टाळावी कारण कॉफीने ब्लडप्रेशर वाढतो. मांसाहार पूर्णपणे टाळता आला तर उत्तमच परंतु जर आवडत असेल तर महिन्यातुन २ वेळा खावे आणि अंडी आठवड्यातून ३ वेळा खावे. त्यातूनही सुकी मासळी खाऊ नये.
सिगारेट, दारू, तंबाखू यासारखे व्यसन तर पूर्णपणे टाळावे. एकूणच घरी बनवलेले जेवण आणि स्नॅक्स खावे. आयुर्वेदामध्येही विड्याचे पान, गुलकंद, वेखंड चूर्ण, अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही किंवा वाढलेला उच्च रक्तदाब कमी होतो असे वर्णन आहे.
विहार :
ह्या पथ्यकर आहारासोबतच पुरेशी झोप घेणे, सरसकट सर्वांसाठी आठ तास झोप घेणे हा नियम नाही, शारिरिक श्रम, मानसिक ताण तणाव, थकवा ह्यानुसार झोपेचे प्रमाण बदलते. 30 ते ४५ मिनिट्स आठ वड्यातुन 5 ते 6 दिवस व्यायाम करणे हे तर हवेच तसेच मेडिटेशन (ध्यान ) रोज केल्यामुळे उच्च रक्तदाब कमी झालेला मला माझ्या प्रॅक्टीसमध्ये आढळुन आलेले आहे, ध्यान वैगेरे यासारख्या गोष्टी आवघड वाटत असतील तर दिवसभरातुन केव्हाही 10 मिनिट्स डोळे बंद करुन नुसतेच शांत बसण्याने सुद्धा उच्च रक्तदाब कमी झालेला आढ्ळुन आलेला आहे.
डॉ स्वाती खारतोडे
संशोधक आणि वैद्यकीय आहारतज्ञ
विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर
पुणे