पुणे : पुण्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडले गेलं असून हा खूप गंभीर मुद्दा आहे. ४ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. आम्ही मनसेकडून अवेअरनेस मोहिम सुरु करणार आहोत. एका शहरात इतके ड्रग्ज सापडले आहेत तर, त्याला गृहमंत्री जबाबदार असल्याचा घणाघात अमित ठाकरे यांनी केला आहे. ते आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच अमित ठाकरे यांनी विद्यार्थी-युवकांसह विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, पुणे विद्यापीठाच्या स्थापनेपासून आपण मेसमध्ये जेवण चांगले मिळत नाही यासाठी भांडत आहोत. ही शोकांतिका झाली आहे. काल पोह्यामध्ये झुरळ मिळाले. यावेळी त्यांनी फोटोही दाखवला. तसेच त्यांनी वॅाशरुम आणि होस्टेलचे फोटो दाखवले. त्यांनी सांगितले की, मला प्रत्येक विद्यापीठात मनविसेचे युनिट हवे आहे. पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि नगरमध्ये उपकेंद्र असून तेथील नवीन इमारती तयार आहेत, मात्र मंत्र्यांना वेळ मिळत नसावा म्हणुन उद्घाटन होत नसल्याचा टोला देखील अमित ठाकरेंनी लगावला आहे.
पुढे म्हणाले, मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पाहत आहे. ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये. मी त्यांना आठ दिवसांचा वेळ दिला आहे. त्या वेळेत त्यांनी कारवाई केली नाही, तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करु असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे.