पुणे : ‘होळी रे होळी .. पुरणाची पोळी’ अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या होळी सणाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. कोरोनानंतर सगळेच सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जात आहे. कोणताही सण आला की सोशल मीडियावर ट्रेंड सुरु होतोत. त्यात तर होळी आणि रंगपंचमी सर्वांनाच आवडणारी सण आहे. त्यामुळे या सणाची आतुरता लागली आहे.
शहरात होळी, रंगपंचमी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. रंगपंचमीला मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. नारिकांची रंगांची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे रंग आणि गुलाल विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. होळी, रंगपंचमी या सणाला सामाजिक महत्त्व आहे. या दिवशी लोक आपसातील मतभेद विसरून एकत्र येतात. एकमेकांना रंग लावून हा उत्सव साजरा केला जातो. लाल रंग प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. त्यामुळे हा रंग लावल्यास वाद मिटतात आणि प्रेम वाढते, अशी भावना आहे.
बाजारपेठा आणि चौकांमध्ये रंग, गुलालासह पिचकारी, मुखवटे, टोप्या, टिमक्या आदी वस्तूंची दुकाने थाटली आहेत. होळीच्या भोवती वाद्ये वाजवण्याची प्रथा आहे. यासाठी टिमक्या, ताशा वापर केला जातो. बाजारात ४० ते १५० रूपयांपर्यंत ते उपलब्ध आहे. एकूणच होळी आणि रंगपंचमीचा उत्साह बाजारात फुलत आहे.
रंगपंचमीमध्ये लावण्यात येणारे रंग हे नैसर्गिकच असले पाहिजेत. अशी जनजागृती केली जाते. त्यामुळे नागरिकांची नैसर्गिक रंग आणि हर्बल गुलालाची मागणी वाढली आहे. नैसर्गिक रंग, हर्बल गुलाल, सुगंधित गुलाल, गुलाल स्प्रे, नॅचरल पेंटची बाजारात १५० ते १२०० रूपयांपर्यंतच्या कॅनमध्ये उपलब्ध आहे. पिचकारी बाजारात १० ते १००० रूपयांपर्यंत उपलब्ध आहे. पुंगी, वॉटरबलून १० ते १५० रूपये, केसांचे पंख १५० ते २५० रूपये, टोपी १५ ते १०० रूपये, यावेळी बाजारात स्वदेशी वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
सण साजरे करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सगळेच सण आता मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. त्यात रंगपंचमी हा लहानांपासून ज्येष्ठांना आवडणार सण आहे. सध्या बाजारपेठेला चांगले दिवस आले आहे. नैसर्गिक रंग, गुलाल, पिचकारी, मास्क, पाण्याचा फुगा, केसांचा विग, ओपी, आदी वस्तूंची मागणी खूप वाढली आहे. मात्र मागणी पेक्षा पुरवठा कमीच आहे.
हा सर्व माल दिल्लीतून येतो.
– सुरेश जैन, व्यापारी.