लोणी काळभोर : अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे महाकाय होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी (ता.१८) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. तर एका घोड्याला किरकोळ मार लागला आहे. मात्र, या घटनेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत व धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भरत साबळे (वय-५७, रा. येरवडा, पुणे), अक्षय कोरवी (वय -२७, रा. पुणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी एक सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी पुण्यातील एका बँड बाजा पथकाला सुपारी देण्यात आली होती. या सोहळ्यासाठी पथक गुलमोहर लॉन्स येथे वाजविण्यासाठी आले होते. यावेळी गुलमोहरच्या समोरील अंगणात वाजंत्री बसले होते. तेथेच एका झाडाखाली घोडा गाडी बांधण्यात आली होती. येथील ओढ्यालगत एक धोकादायकरीत्या एक होर्डिंग बांधण्यात आलेले आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी सव्वा चार वाजण्याचा सुमारास अवकाळी पाऊस व वादळी वारा सुरु झाला. या पावसात हे धोकादायकरीत्या बांधण्यात आलेले महाकाय होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली भरत साबळे व अक्षय कोरवी हे दोघे सापडले. तेव्हा या दोघांना नागरिकांनी तातडीने बाहेर काढले व उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. तर या दुर्घटनेत घोडाही किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गोपनीय हवालदार रामदास मेमाणे, अंमलदार अजिंक्य जोजारे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जचा सुळसुळाट
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फ्लेक्स व होर्डिंग्ज आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेली होर्डिंग्ज प्रवाशांसाठी अडचणीची ठरत असून, या होर्डिंग्जमुळे प्रवासी, पादचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर, पंधरा नंबर, शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोल नाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी कॉर्नर, माळी मळा, थेऊरफाटा, कुंजीरवाडी चौक, नायगाव फाटा, पेठ वाकडा पूल, सोरतापवाडी फाटा, इनामदारवस्ती, एलाईट चौक, तळवाडी चौक व खेडेकर मळा या परिसरात असंख्य अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज धोकादायकरित्या लावलेले आहेत.
View this post on Instagram
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
गतवर्षी याच महिन्यात कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत कवडीपाट टोलनाका व एमआयटी कॉर्नरजवळील अनधिकृत होर्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला दोन तरुण चिकटून गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने त्यांना तत्काळ उपचार मिळाल्याने दोन्ही तरुण या दुर्घटनेतून सुखरूप बचावले. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कारवाई कधी?
हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक अनधिकृत होर्डिंग्ज धोकादायकरीत्या लावलेले आहेत. आता गुलमोहर लॉन्स येथील होर्डिंग पडून दोघेजण जखमी झाले आहेत. या धोकादायकरीत्या लावलेल्या होर्डिंगमुळे अजून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाच्या वतीने कारवाई होणार का ? एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.