पुणे : किरकोळ कारणावरून मारहाण, खून करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. नुकताच पुण्यातील सहकारनगर परिसरात असाच प्रकार उघडकीला आला. व्यायामशाळेत व्यायाम करणाऱ्या तरुणाची चेष्टा-मस्करी केल्याचा समज झाल्याने एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी प्लेट मारली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव राहुल दीपक टेकवडे (वय २८, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव मोरे (वय २३, रा. दत्तनगर, कात्रज) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. टेकवडे आणि मोरे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघेही अनेक दिवसांपासून एकाच व्यायामशाळेत व्यायामासाठी जातात.
दरम्यान, मित्रांमध्ये गंमतीत संवाद सुरू असताना, मोरे आपल्यालाच चिडवत असल्याचा टेकवडे याचा गैरसमज झाला. या कारणावरून व्यायामशाळेत दोघांमध्ये वाद झाला. यामुळे रागाच्या भरात टेकवडे याने व्यायामशाळेतील दहा किलो वजनाची लोखंडी प्लेट मोरे याच्या डोक्यात मारली. शिवीगाळ करुन टेकवडे याने जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बेरड करत आहेत.