पुणे : चांद्रयान-३ मधील लँडर मॉड्यूल आज २३ ऑगस्ट रोजी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. या यशानंतर चंद्रावर लँड होणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. तर, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँड होणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता चंद्राचा अभ्यास करण्यास मोलाची मदत होणार आहे. इस्रोच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. महत्त्वाचं म्हणजे, आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात झटकून टाकली गेली आहेत.
तब्बल ४० दिवसांचा प्रवास करत चंद्रयान ३ अखेर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले आहे. चंद्रावर दिवस आणि रात्रीचा कालावधी 14 दिवसांचा आहे. म्हणजेच 14 दिवसानंतर रात्र येते. 23 ऑगस्टला सूर्योदय होणार असल्यानेच हा दिवस निवडला गेला होता. दक्षिण ध्रुवावर आता १४ दिवस सूर्यप्रकाश असणार आहे. तर २३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत दक्षिण ध्रुवावर प्रखर ऊन असणार आहे. त्यामुळे लँडरवरील सोलार पॅनेलला मदत होणार आहे. चंद्रयान रोव्हर चार्ज होईल आणि आपलं मिशन पूर्ण करण्यास मदत होईल.
चंद्राचा दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो. येथील वातावरण अतिशय थंड असते. भारताच्या चांद्रयान-१ ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. त्यानंतर आता तेथे पाण्याचे साठे शोधणे हे चांद्रयान-३ चं प्रमुख उद्दीष्ट आहे. चंद्रावरील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे.
कसा होता ‘चंद्रयान ३’चा प्रवास
– १४ जुलै- चंद्रयान ३, १७० किमी ते ३६५०० किमी परिघात सोडलं होतं. चंद्राच्या दिशेने जाताना अंडाकृती फिरत ते जवळ जात होतं.
-१५ जुलै- चंद्रयान ३ चं परिघ वाढवून ४१७६२ किमी ते १७३ किमी केलं गेलं.
-१७ जुलैला- दुसऱ्यांदा परिघ वाढवण्यात आला आमि ४१६०३ किमी ते २२६ किमी करण्यात आला.
– १८ जुलै- तिसऱ्यांदा परिघ वाढवून ५१४०० किमी ते २२८ किमी करण्यात आला.
– २० जुलै- चौथ्यांदा परिघ वाढवून ७१३५१ किमी ते २३३ किमी इतका करण्यात आला.
– २५ जुलै- पाचव्यांदा परिघ वाढवण्यात आला आणि १२७६०३किमी ते २३६ किमी करण्यात आला.
– ३१ जुलै- आणि १ ऑगस्टच्या मध्यरात्री पृथ्वीच्या कक्षेबाहेर जात चंद्राकडे प्रस्थान केलं.
– ५ ऑगस्ट- चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
– २३ ऑगस्ट- संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं.