पुणे : शहर आणि परिसरात सेक्स रॅकेटमध्ये अडकणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रमाण वाढले आहे. बालेवाडी परिसरातील हॉटेल व अपार्टमेंटमध्ये व्हाट्सअपद्वारे ऑनलाईन पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील ११ तरुणींची सुटका करण्यात आली.
ही कारवाई बुधवारी (ता. २४) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल टॅग हाऊस, पॅनकार्ड क्लब रोड वरील स्नेह अपार्टमेंट आणि लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलच्या खोलीत करण्यात आली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात राहुल मदन उर्फ मदन सन्यासी आणि रॉकी कदम, दिनेश उर्फ मामा, नवीन, रोषन (नाव पत्ता महित नाही) यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार मनिषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे.
बालेवाडी येथील दोन हॉटेल आणि एका अपार्टमेंटमध्ये व्हॉट्सअपद्वारे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर मिटकॉन कॉलेजजवळील हॉटेल टॅग हाऊसमधील तीन रुममध्ये छापा टाकला. तसेच स्नेह अपार्टमेंट आणि द विला हॉटेलमधील रुममध्ये छापा टाकून ११ तरुणीची सुटका करण्यात आली. आरोपींनी हॉटेलमध्ये रूम बुक करुन त्याठिकाणी पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत.