पुणे : शहरातील बाणेर परिसरातील उच्चभ्रु वस्तीतील दोन हॉटेलवर ऑनलाईन चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे शहर सामाजिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. व्हॉट्सअॅप मिडीयाच्या माध्यमातून हे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी बाणेरमधील लॉज व हॉटेलवर मध्यरात्री छापेमारी करून तब्बल ११ मुलींची सुटका केली.
या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात रॉकी कदम, राहुल मदन उर्फ मदन सन्यासी, दिनेश उर्फ मामा तसेच नविन व रोशन (नावे पूर्ण माहिती नाहीत) या पाच एजंटवर पिटा अॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनंतर पुणे शहर सामाजिक विभाग व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, इम्रान नदाफ, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, सागर केकान, राणे, मनिषा पुकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध प्रकारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सामाजिक सुरक्षा विभागाकडून जोरदार कारवाई सुरू आहे.