केडगाव (पुणे) : सध्याच्या घडीला नोकरी मिळविणे फारच कठीण झाले आहे. त्यात बरेच तरुण-तरुणी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात. महाराष्ट्रात एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. एमपीएससी मार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती केली जाते. यासाठी विद्यार्थी देखील अहोरात्र मेहनत घेत असतात. मात्र यातही काहींना यश मिळते, तर काहींच्या पदरी निराशा पडते. पण दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगराएवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणे शक्य होते. याचेच एक उदाहरण पाहायला मिळाले, दौंड तालुक्यातील एकेरीवाडी गावच्या हेमलता कोळपे यांनी कठोर परिश्रम घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून त्याची जलसंपदा विभाग पुणे येथे मेजरर अधिकारीपदी वर्णी लागली आहे.
हेमलता कोळपे यांचे बालपण हे दापोडी (केडगाव ) येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण दापोडी येथील प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण मनोरमा विद्यालय केडगाव तर बीसीएस ची पदवी आण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे पूर्ण केली. तर फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे एमसीएस चे शिक्षण पूर्ण केले आहे.
हेमलता कोळपे ह्या दौंड तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमोडे (दापोडी) यांची कन्या असून शिक्षणाचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. हेमलता यांचा विवाह 13 वर्षापूर्वी एकेरीवाडी येथील संतोष कोळपे यांच्याशी झाला आहे. पण त्यांना शिक्षणाची आवड असल्याने लग्नानंतर ही त्यांनी शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षा ची तयारी चालू ठेवली. सासरकडील परिस्थिती जेमतेमच पण पतीची खंबीर साथ मिळाली व गेली 12 वर्ष त्यांनी कठोर परिश्रम केले. यात त्यांना यश आले असून त्यांची जलसंपदा विभाग मेजररपदी निवड झाल्याने सर्व स्तरावरून त्याचे कौतुक केले जात आहे.
गेली 12 वर्ष मी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी संघर्ष करत होते. घरातील बाहेरील कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होता आले नाही. माझे ध्येय एकच होते, की अधिकारी होण्यासाठी मला माझ्या पतीची, सासू सासरे, आई वडिलांची मोलाची साथ मिळाली. मी इतर विद्यार्थ्यांना एकच संदेश देते की, यश मिळवणे तितके सोपे ही नाही आणि तितके अवघडही नाही. त्यामुळे आपण आपले प्रामाणिकपणे प्रयत्न सुरु ठेवले पाहिजे. यश एकदिवस नक्की मिळते.
– हेमलता कोळपे (वाघमोडे)