पुणे : होळी आणि धुलीवंदनाचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी आणि धुलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या दिवशी रंग, पिचकारी आणि पाण्याचे फुगे एकमेकांच्या अंगावर फेकून रंग खेळतात. परंतु, या आनंदाच्या सणात काही स्त्रियांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी खास होळीसाठी महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे.
ठिकठिकाणी रंग खेळण्यासाठी जमलेल्या अनेक स्त्रिया आणि मुलींशी गैरवर्तन होते. ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी खास होळीसाठी महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. यावेळी कोणत्याही महिलेशी गैरवर्तणूक झाल्यास ती या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवू शकते.
विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा म्हणाले, “आम्ही महिलांनादेखील आवाहन करतो की, छेडछाड झाल्यास किंवा असुरक्षित वाटत असल्यास त्यांनी 112 क्रमांकावर कॉल करावा. हा कॉल जवळच्या पोलीस स्टेशनशी जोडला जाईल आणि तत्काळ कारवाई केली जाईल.”
दरवर्षी होळीच्या उत्सवादरम्यान पोलीस नियंत्रण कक्षाला लैंगिक अत्याचार, छळ आणि इतर गुन्ह्यांची तक्रार करणाऱ्या अनेक महिलांचे कॉल येतात. त्यामुळे पोलीस विभागाने होळीच्या पार्ट्या आयोजित करण्याची परवानगी देताना, आयोजकांसाठी अनेक गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.
या गाईडलाइन्समध्ये महिलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी होळी पार्टीच्या ठिकाणी योग्य कर्मचारी नियुक्त करण्याच्या अटीचा समावेश आहे. अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिली आहे.