पुणे : पुणे महापालिकेतील दुचाकी वापरणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याचा आदेश निघाल्यानंतर सोमवार (दि. १८) पासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पुणे विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, महाविद्यालये, तसेच शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले असून, त्याचे पालन सर्व संबंधितांनी करावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकतेच दिले होते.
त्यानंतर पुणे महापालिकेने देखील आदेश जारी केले आहेत. भारतात व महाराष्ट्रात रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुचाकीस्वारांनी जर हेल्मेटचा वापर केला, तर अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येमध्ये निश्चित घट होऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मट वापराची सक्ती व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी, अशा सक्त सूचना न्यायमूर्ती सप्रे यांनी दिले असल्याबाबत परिपत्रकांमध्ये नमूद केले आहे.