पुणे : दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मजुराच्या डोक्यात दगड घालून, तोंडाला रुमाल बांधून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना 7 ते 9 जून या कालावधीत बाणेर भागातील धनकुडे वस्तीत घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खुन करण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नसून, चतु: श्रुंगी पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
नाना विठ्ठल चादर (वय 36, रा. वाकड, मुळ. नाळवंडी रोड बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत नाना याचा भाऊ सचिन चादर (वय 34) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नाना मजुरी करतो. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. पंधरा दिवसापूर्वी नाना त्याच्या बालेवाडी येथील मित्राकडे राहण्या करीता आला होता. त्या ठिकाणाहून दोन दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. बाणेर परिसरातील धनगुडे वस्ती येथे रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एकजण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नाना याचे तोंड रक्ताने माखलेले होते. त्याच्या तोंडावर रुमाल बांधलेला होता. तसेच डोक्यात कठीण वस्तूने मारल्यामुळे गंभीर जखम झालेली होती.
पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर नानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. पुढील तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.