पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात तब्बल २५ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खून झालेल्या व्यक्तीवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अत्याचार, विनयभंग असे तब्बल २५ गुन्ह्यांची नोंद आहे. या व्यक्तीवर कॅम्पात पहाटे टोळ्याने हल्ला करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अरबाज बबन शेख (रा. चुडामण तालीम, कॅम्प) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अरबाज शेख हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्या नावावर अगदी खूनाचा प्रयत्न केल्यापासून ते जबरी चोरी, चोरी, मारहाण, विनयभंग असे जवळपास २५ गुन्हे दाखल होते. त्याची कॅम्प परिसरात मोठी दहशत होती. त्याला एमपीडीएअंतर्गत कारवाई करुन कारागृहात स्थानबद्ध देखील केले होते. त्या गुन्ह्यातून तो नुकताच सुटला होता. पोलीस नियंत्रण कक्षाला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कॅम्पमधील खाऊ गल्लीत मारामारी सुरु असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा मारेकरी पळून गेले होते. यावेळी घटनास्थळी एक तरुण निपचिप पडलेला होता. त्याला ससून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे जाहीर केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील व त्यांच्या सहकार्यांनी परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून त्यावरुन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.