पुणे: गंगाधाम रस्त्यावर गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण अपघाताची दखल घेत वाहतूक नियंत्रण विभागाने मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर रस्ता दरम्यान ट्रक, ट्रेलर, डंपर अशा जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश नुकतेच जारी केले.
गंगाधाम रस्त्यावर १२ जून २०२४ला डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी दमयंती भूपेंद्र सोळंखी (वय ५९, रा. गंगाधाम रस्ता) यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांची सून प्रियंका राहुल सोळखी (वय २२) जखमी झाल्या. गंगाधाम रस्त्यावर अनेक गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामुळे, बांधकाम साहित्य घेऊन येणारे ट्रक, डंपर भरधाव वेगाने जातात. अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर यापूर्वी अनेकदा अपघात झाले आहेत. या भागातील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी गंगाधाम रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश दिले.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कान्हा हॉटेल (शत्रुंजय मंदिर) ते गंगाधाम चौक, कोंढवा भागातील टिळेकरनगर ते गंगाधाम चौक या रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी ट्रक, डंपर, सिमेंट वाहतूक करणारे मिक्सर, कंटेनर, ट्रेलर अशा जड वाहनांना सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत बंदी घालण्याचे आदेश वाहतूक शाखेने दिले आहेत.