पुणे : शहरात पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडले असून त्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. त्या रस्त्यावरून जड वाहन जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने शहरातील महत्वाच्या 30 चौकातून जड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री दहा दरम्यान बंदीचा निर्णय घेतला आहे. या आदेशाची 12 ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
प्रमुख चौक जड वाहनांसाठी (डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर, तसेच अन्य जड वाहने) बंद करण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग संथ झाला आहे. त्यामुळे चौकाचौकात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रमुख 30 चौकात जड वाहनांना 12 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश तात्पुरते आहेत, असे पोलीस उपायुक्त पवार यांनी सांगितले.
सकाळी नऊ ते रात्री दहा दरम्यान जाण्यास व येण्यास प्रवेश बंद असलेले चौक पुढीलप्रमाणे…
पौड फाटा चौकाकडून कर्वे रस्ता आणि डेक्कन, लॉ कॉलेज रोडकडे, संचेती चौकातून जंगली महाराज रस्त्याकडे आणि गणेशखिंड रस्त्याकडे, कोर्ट रस्त्याकडे, राजाराम पूल येथून डी.पी. रस्त्याकडे, दांडेकर पुलाकडून शास्त्री रस्त्याकडे, निलायम पुलाकडून ना.सी. फडके चौकाकडे, सावरकर पुतळा चौक बाजीराव रस्त्याकडे, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकाकडून जेधे चौकाकडे, सेव्हन लव्हज चौकाकडून जेधे चौकाकडे आणि पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रस्त्याकडे, खाणे मारूती चौकाकडून इस्ट स्ट्रीटकडे, पॉवर हाऊस चौक मालधक्का चौकाकडे, आर.टी.ओ. चौक शाहीर अमर शेख चौकाकडे, पाटील इस्टेट चौक आर.टी.ओ. चौकाकडे, ब्रेमेन चौकाकडून पुणे विद्यापीठ चौकाकडे, शास्त्री नगर- गुंजन चौकाकडे, आंबेडकर चौक सदलबाबा चौकाकडे, चंद्रमा चौक सादलबाबा चौकाकडे, मुंढवा चौक ताडी गुत्ता चौकाकडे, नोबेल चौक भैरोबानाला चौकाकडे, लुल्लानगर भैरोबानाला चौकाकडे, लुल्लानगर गोळीबार मैदान चौकाकडे, लुल्लानगर- गंगाधाम चौकाकडे, पुष्पमंगल चौक ते जेधे चौककडे, राजस सोसायटी महेश सोसायटी चौकाकडे, पोल्ट्री चौक आरटीओ चौकाकडे, उंड्री एनआयबीएम कडे, पिसोळी हडपसर कडे, हांडेवाडी हडपसर कडे, अभिमानश्री चौक, बाणेर रोड पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमानश्री चौक, पाषाण रोड पुणे विद्यापीठ चौकाकडे.