पुणे : राज्यात पावसाने मे महिन्यात धडक मारल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाला ब्रेक लागला होता आता पुन्हा एकदा पावसाने राज्यासह पुण्यात हजेरी लावली आहे. पुण्यात आज पावसाचे आगमन झाल्यानंतर राज्यातील इतर भागात देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

पुण्यात जून महिन्याच्या सुरुवातील उन्हाचा कडका जाणवत होता. अशातच आता पाऊसाचे आगमन झाल्यानंतर पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. सध्या सर्वत्र थंड वारे वाहू लागल्याने पुणेकर आनंदी झाले आहेत. पुण्यात सध्या मध्यभागी पाऊस पडत असून, आज पुण्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात करण्यात आला आहे. पुण्यात पुढील आठ दिवस असाच पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर परिसर, पुणे स्टेशन, शहरातील मध्यभागी असलेल्या पेठा याठकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुण्यासह, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातील ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यासह राज्यातील नागरिकांना पावसाच्या दिवसात योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात येत आहे.







