अमित मुंडिक

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार गट) संघटनात्मक बांधणीला नवे बळ देण्यासाठी पुणे शहरामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या नेत्यांकडे सोपवण्यात आल्या आहेत. या फेरबदलांमध्ये काशिफ सय्यद यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते शहर महासचिव म्हणून पक्षासाठी सक्रिय भूमिका बजावत होते.

काशिफ सय्यद हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात कार्यरत असून, विशेषतः कोंढवा, हडपसर, वानवडी, आणि स्वारगेट परिसरात त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवले गेले आहेत. सामाजिक न्याय, महिला सुरक्षा, शिक्षण, आणि गरीब व गरजूंसाठी विविध उपक्रमांतून त्यांनी आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने पुणे शहरात आगामी महापालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. उपाध्यक्ष या पदावरून काशिफ सय्यद यांच्याकडे पुणे शहरात पक्ष संघटन मजबूत करणे, युवावर्गाला जोडणे, आणि सामाजिक विषयांवर अधिक प्रभावीपणे भूमिका मांडणे अशी जबाबदारी असेल. त्यांचा सामाजिक क्षेत्रातील अनुभव आणि कार्यक्षमता पाहता, पक्षाच्या शहरातील वाढीसाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे.
काशिफ सय्यद यांचा प्रवास
काशिफ सय्यद यांनी अनेक वेळा स्थानिक नागरिकांच्या समस्या घेऊन प्रशासन दरबारी आवाज उठवला आहे. त्यांनी गरजूंना मोफत रेशन वाटप, आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम, आणि पर्यावरणस्नेही मोहीम यशस्वीरित्या राबवल्या आहेत. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारताना काशिफ सय्यद यांनी सांगितले की, “शरद पवार साहेबांच्या विचारसरणीप्रती मी कटिबद्ध आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहीन. पुण्यातील युवक, महिला, आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न ऐकणे आणि त्यावर कृती करणे, हेच माझे उद्दिष्ट असेल.”







