विजय लोखंडे
वाघोली: वाघोली येथे गारांसह पडलेल्या अवकाळी पावसाने वाघोलीच्या अनेक अंतर्गत रस्त्यांसह महामार्गावरून पाणी वाहत होते. भावडी रोडवर पाणी वाहण्यासाठी मार्गच नसल्याने या रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले होते. पूर्व हवेली तालुक्यात वाघोलीसह विविध गावांमध्ये तुरळक गारा पडल्या. मंगळवार (दि.१६) सायंकाळपासून वाघोलीत वीज पुरवठा खंडित झाल्याने वाघोलीकर त्रस्त झाले असून, याकडे वीज वितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाघेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी केला.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. भावडी रोडला अक्षरशः नदीचे स्वरूप आल्याने नागरिकांना मोठी कसरत करत पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. बुधवारीही तुरळक गारांसह पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या, फ्लेक्स, कमानी, बोर्ड, विद्युत पोलचे नुकसान झाले. फाटलेले होर्डिंगचे फ्लेक्स हवेत उडून इतरत्र उडत होते.
विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांना मच्छरांसह उष्णतेचा सामना करावा लागला. अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर भावडी रोडवर परिसरातील नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मोठी कसरत करत जावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मंगळवार व बुधवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस पडल्याने वाघोली परिसरातील अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे विजेअभावी उद्योग, व्यवसाय बंद पडले होते. तर नागरिकांना ऐन उन्हाळ्यात गरमीचा सामना करावा लागला. मात्र, खंडित झालेला वीज पुरवठा सुरुळीत करण्याकडे वीज खात्याने दुर्लक्ष केले.
झाडांच्या फांद्या तोडायला हव्यात
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोनही बंद होता. अशा परिस्थितीत वीज खाते चाणाक्ष राहिले पाहिजेत. वाघोली परिसरात वीज वाहक तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडायला हव्यात. असे केल्यास वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या वीज वाहक तारांवर पडणार नाही.
– राजेंद्र सातव पाटील, अध्यक्ष, वाघेश्वर देवस्थान ट्रस्ट.