पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रभरात दौरा सुरू आहे. दरम्यान, पीएम मोदी आज मंगळवारी (12 नोव्हेंबर) पुण्यात दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाचीही संपूर्ण तयारी झाली असून शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा एस. पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. यादरम्यान, पुणे पोलिसांसह या दौऱ्याची मुख्य जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे असणार आहे. लोहगाव विमानतळ ते सभा स्थळापर्यंत मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.
मोदींच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांसह या दौऱ्याची मुख्य जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे असणार आहे. यामुळे लोहगाव विमानतळ ते सभा स्थळापर्यंत मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून करण्यात आली आहे. तसेच विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तासाठी असणार आहे. जंगली महाराज रस्ता, विमानतळ रस्ता, टिळक रस्ता परिसरात सोमवारी सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, 23 सहायक पोलीस आयुक्त, 135 पोलीस निरीक्षक, 570 पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.