पुणे : कोंढव्यातील महंमदवाडी परिसरातील दिल्ली पब्लिक स्कूलजवळ बहुमजली इमारतीच्या अकराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत मंगळवारी (ता. ६) दुपारी आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच रहिवाशांनी तत्काळ इमारतीच्या गच्चीवर धाव घेतली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांना तत्काळ पाचारण करण्यात आले. जवानांना पाऊण तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
दरम्यान, इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील सदनिकेतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती कळताच रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यानच्या काळात सदनिकेला लागलेली आग भडकल्याने रहिवासी भयभीत झाले. घाबरून रहिवाशांनी इमारतीच्या अकराव्या मजल्यावर धाव घेतली.
थोड्याच वेळात घटनास्थळी पाच बंब आणि उंच शिडीचे वाहन दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.