राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलंच झोडपलं आहे. या पावसात अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक घरांची छपरे उडाली आहेत. तसेच यवत परिसरातील अनेकांच्या जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर सहजपूर हद्दीतील चंद्राई लॉन्स जवळ अपघात झाला आहे. या अपघातात दोघे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.
तसेच शेतात कापणी करून ठेवलेले धान्य देखील हवेत उडाले आहे. शेतातील उसाच्या पिकासह अनेक झाडे कोलमडून पडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडला आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील यवत गावाला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी देखील नागरिक करत आहेत. यवत परिसरातील अनेक गुऱ्हाळांचे पत्रे देखील उडाले आहेत. अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने ताराही तुटल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला असून महावितरणकडून तातडीने विद्युत पुरवठा सुरुळीत करण्याचे काम सुरू आहे.