पुणे : पुण्यातील आकाश निरभ्र असून, उन्हाचा चटका कायम आहे. गुरुवारी (दि. २ मे) मगरपट्टा येथे कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस इतका होता. शिवाजीनगरचा पारा ३९.७ अंश सेल्सिअसवर होता. दरम्यान, शहर परिसराचा पारा ४२ अंशांवर जाणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शहरात मागील काही दिवस कमाल तापमानात वाढ झाली असून, पारा ४० अशांच्यावर गेलेला आहे. त्यामुळे उकाडाही तीव्र जाणवत आहे. दरम्यान, कमाल तापमानात गुरुवारी किंचित घट झाली आहे. पुढील काही दिवस उन्हाचा चटका कायम राहणार आहे. वाढत्या उन्हामुळे शहरातील दुपारची वर्दळ कमी झाली आहे. रात्रीच्या तापमानही सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे शहरात रात्रीचाही उकाडा आहे. हडपसर येथे किमान तापमान २६.२ अंश सेल्सिअसवर गेले आहे. गुरुवारी कोरेगाव पार्क येथे ४०.८, वडगावशेरी ४०.७, पाषाण ३९.८, हडपसर ३९.६, तर एनडीए येथे ३९.५ अंश सेल्सिअस तापमान होते. येत्या ३ ते ८ मे दरम्यान आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, शहर परिसरात तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस इतके राहणार आहे.