पुणे : देशात आणि राज्यात सर्वात चर्चेत राहिलेली बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिच्या जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकरचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळणाऱ्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. नागरी सेवा परीक्षेत परवानगीपेक्षा जास्त संधी मिळविण्यासाठी तिने स्वत:ची खोटी ओळख करून दिल्याचा आरोप तिच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने गेल्या आठवड्यात पूजा खेडकर यांची याचिका फेटाळल्यानंतर खेडकरनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये असे आढळून आले की, नागरी सेवा परीक्षेत अतिरिक्त प्रयत्नांसाठी खोटी ओळख पटवण्याशी संबंधित आरोप आहेत. यावेळी ट्रायल कोर्टाचे न्यायमूर्ती याबाबत म्हणाले की, संपूर्ण घटनेचा उलगडा करण्यासाठी आणि यामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा सहभाग निश्चित करण्यासाठी आरोपीची कोठडीत चौकशी आवश्यक आहे.