विजय लोखंडे
वाघोली: कोलवडी साष्टे येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सरकारी दवाखान्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. प्रथमच येथे जुन्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागेवर आरोग्य उपकेंद्र उभा राहणार आहे. यासाठी शासनाच्या वतीने ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नूतन आरोग्य उपकेंद्राच्या कामाचा शुभारंभ कोलवडी-साष्टे ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक गायकवाड, उपसरपंच निलेश रिकामे यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी माजी उपसरपंच रमेश मदने, ग्रामपंचायत सदस्य सचिन गायकवाड, संदिप गायकवाड, स्वप्निल नितनवरे, योगेश मुरकुटे, शितल भाडळे, चैत्राली गायकवाड, स्वाती गायकवाड, प्रिया गायकवाड, निशा भोर, निता भालसिंग, प्रियंका शितोळे, ग्रामविकास अधिकारी प्रविन खराडे, माजी उपसरपंच नाना भाडळे, विश्वनाथ गायकवाड, माजी उपसरपंच निर्मला अडसुल, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता गुजर, शाखा अभियंता भंडारी, कंत्राटदार येवले, सचिन जाधव, सनी काळे, प्रतिक सस्ते, प्रवीण शिंदे, योगेश शिळीमकर, आदी उपस्थित होते.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात प्रसूती गृह, लसीकरण केंद्र, लॅब अशा सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे आता अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आरोग्याचा मुख्य प्रश्न मार्गी लागत आहे.
कोविड काळामध्ये आमच्या कोलवडी-साष्टे गावामध्ये आरोग्य उपकेंद्र म्हणजेच सरकारी दवाखाना उपलब्ध नसल्याने आम्हाला लसीकरणासाठी इतर गावांची मदत मागावी लागली. इतर गावांमध्ये जाऊन लसीकरण करून घ्यावे लागले होते. कोरोनाच्या काळात ग्रामस्थांसमोर खूप मोठी अडचण निर्माण झाली होती. पण आता गावात आरोग्य उपकेंद्र सुरू असल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
– संभाजी काळे, ग्रामस्थ – कोलवडी-साष्टे