पुणे : पुण्याच्या पानशेत धरण परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. पानशेत धरणाच्या सांडव्यातील पाण्यात उतरून सेल्फी काढताना बुडणाऱ्या बहिणांना वाचवताना भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी २१ जानेवारीला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय १८ रा. खराडी, पुणे) असे मयत युवकाचे नाव आहे.
बुडणाऱ्या दोन बहिणींना स्थानिक युवकांनी जीवाची बाजी लावून वाचवले असल्याची माहिती वेळे पोलिसांनी दिली. अनुसया बालाजी मनाळे व मयुरी बालाजी मनाळे अशी त्याच्या बहिणींची नावे आहेत. ज्ञानेश्वरच्या मृत्यूने पानशेत परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
स्थानिक युवक साईराज संतोष रायरीकर आणि करण बाबुराव चव्हाण आरडाओरडा ऐकून सांडव्यात उड्या मारून बुडणाऱ्या अनुसया आणि मयुरी यांना जीवाची बाजी लावून बाहेर काढले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती मिळताच पानशेत पोलिस चौकीचे पोलिस हवालदार पकंज मोघे, अंमलदार कांतीलाल कोळपे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सह्याद्री आपत्ती व्यवस्थापनचे पथक तसेच पुणे महानगर प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.
नेमक काय घडल?
पानशेत धरणाच्या सांडव्यातील पाण्याच्या कडेला उभे राहून ते सेल्फी काढत होते. त्या वेळी अनुसया मनाळे ही पाय घसरून पाण्यात पडली, तिला बाहेर काढण्यासाठी तिची बहीण मयुरी ही पाण्यात उतरली, मात्र वेगाने वाहणाऱ्या पाण्यात दोघीजणी बुडू लागल्या त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी भाऊ ज्ञानेश्वरने अंगावरील कपड्यांसह पाण्यात उडी मारली. पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणातच ज्ञानेश्वर बुडून बेपत्ता झाला. सुदैवाने यावेळी घटनास्थळी असलेल्या साईराज रायरीकर आणि करण चव्हाण या युवकांनी पर्यटकांच्या मदतीने दोघींना सुखरूप बाहेर काढले.
२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला
आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले चोंडे, संदीप सोलसकर आणि आबाजी जाधव तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी एकाच वेळी सांडव्यात उतरून दोन्ही बाजूला ज्ञानेश्वर याचा शोध घेतला. २ तासांच्या शोध मोहीमे नंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते संदीप सोलकर यांना सांडव्याच्या एका बाजूला खोल पाण्यात ज्ञानेश्वरचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी पुण्यात रुग्णालयात नेण्यात आला.