पुणे : पुण्यात काही दिवसांपूर्वी चेक पॉईंटवर चेकींग करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता चेक पॉईंटवर गाडी अडवल्याच्या रागातून नोकरी कशी करतोस, तेच बघतो, असं म्हणत थेट पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ही घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असलेल्या कोल्हेवाडी शिवनगर रस्ता येथे घडली. पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड आणि आर. सी. फडतरे अशी मारहाण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात मंगेश शिवाजी फडके व बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील कोल्हेवाडी शिवनगर रस्ता येथे वाहतूक कोंडी होते. तयामुळे रविवारी वाहतूक कोंडी हटविण्यासाठी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड व आर. सी. फडतरे हे गेले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक कार भरधाव वेगाने येत होती. ते पाहून पोलीस अंमलदार गायकवाड यांनी भरधाव वेगात आलेली कार थांबवून रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी कारचालक मंगेश फडके याने अरेरावी करण्यास सुरुवात केली.
मंगेश फडके हा कार तशीच रस्त्यावर उभी ठेऊन उतरला व “मी कोण आहे तुला माहित नाही? तू नोकरी कशी करतो तेच बघतो, असे म्हणत पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड आणि पोलीस अंमलदार आर. सी. फडतरे यांना मारहाण केली. तेव्हा कारमध्ये बसलेला बापू रोहिदास दळवी हा कारमधून उतरला आणि त्यानेही पोलिसांना मारहाण केली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.