शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील एका तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच जाब विचारणाऱ्या पालकांना आरोपीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सुरेंद्र संपत शिवले, भिवाजी सोनबा शिवले आणि हर्षल भिवाजी शिवले तिघे (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव म्हाळुंगी परिसरातील एक तरुणी घराकडे जात होती, त्यावेळी त्यांच्या गावातील सुरेंद्र याने पिकअपमधून बाहेर येऊन तरुणीचा हात पकडत तरुणीच्या मनास लज्जा निर्माण होईल,असे कृत्य केले. त्यांनतर सायंकाळच्या सुमारास सुरेंद्र हा त्याच्या गावात आला. तेव्हा तरुणीच्या भावाने त्याला जाब विचारला असता त्याने तरुणीच्या भावाला शिवीगाळ आणि दमदाटी करत मारहाण केली.
दरम्यान, सुरेंद्रचा चुलता आणि चुलत भाऊ त्याठिकाणी पोहचले. त्यांनी कसलाही विचार न करता तरुणीच्या भावासह तरुणीची आई व वडिलांना देखील मारहाण केली. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.