लोणी काळभोर (पुणे): शासकीय फी भरुनही वेळेवर मोजणी होत नसल्याने उप अधीक्षक भूमी अभिलेख हवेली कार्यालय हे “हेलपाट्यांचे” कार्यालय बनले आहे. मोजणीच्या ऑनलाईन प्रकरणात मिळालेल्या मोजणी दिनांकालाच ‘विलंबाची खुटी’ मारण्याचा प्रकार होत असल्याने हवेलीच्या मोजणी कार्यालयाला एजंटाचा विळखा पडला आहे. हवेलीच्या मोजणी कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने मिळणाऱ्या तारखांना मोजणीच होत नसल्याचा प्रकार उघडकीस येऊ लागला आहे.
हवेली तालुक्यात खातेदारांना मोजणी केलेल्या नकाशाची प्रत (क प्रत) साठी अत्यंत हीन वागणूक दिली जात असून त्यासाठी ओरिजनल ओळखपत्र दाखवून “साहेबांना” भेटावे लागत असल्याचा चीड आणणारा प्रकार घडू लागला आहे. सरकारी शुल्क भरल्यानंतर मोजणी होत असते, मात्र झालेल्या मोजणीचा नकाशा मिळवण्यासाठी, संबंधितांना भेटल्याशिवाय सहीच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हवेली मोजणी कार्यालयात एकूणच मोजणीसाठी व ‘क प्रत’ साठी नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, दुसरीकडे एजंटाना खातेदारांच्या ओळखपत्राशिवाय तात्काळ क प्रत मिळत असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
सरकारी मोजणी झाल्यानंतर संबंधित भूकरमापक शासकीय रेकॉर्ड व प्रत्यक्ष वहिवाट यावरुन मोजणीचा नकाशा तयार करतात. तदनंतर त्यावर कार्यालयीन प्रमुखांची स्वाक्षरी होत असते. त्यानंतर संबंधित क प्रत अर्जदाराला समक्ष अथवा पोस्टाने दिली जाते, ही साधी व सरळ सोपी पध्दत आहे. मात्र, खातेदार शेतकऱ्यांना क प्रतसाठी ओरिजनल ओळखपत्राच्या नावाखाली ताटकळत ठेवण्याचा प्रकार कोण, कशासाठी व का करतंय हा प्रकार सर्वसामान्यांना कळाला आहे. या कामी एक “मिनी उपअधीक्षक” कार्यरत असून तो खातेदार भेटल्याशिवाय क प्रत साहेबांच्या सहीसाठी पुढे पाठवत नसल्याचा प्रकार अनेक नागरिकांनी ‘पुणे प्राईम न्यूज’ ला भेटून सांगितला आहे.
हवेली मोजणी कार्यालयात तात्काळ मोजणी होण्यासाठी काही लोकप्रतिनिधी लेखी पत्राद्वारे शिफारस करतात. परंतु, लोकप्रतिनिधींच्या पत्राकडे उघडपणे दुर्लक्ष करण्याचा प्रकार होत असल्याने मोजणी कार्यालयाचा प्रशासकीय कारभार चांगलाच चर्चेत आला आहे. मौजे पेठ ता. हवेली येथील गट नंबर ३२३ ची दोन जानेवारीला मोजणी होती. तसेच नांदोशी येथील गट नंबर १२ बाबत दोन फेब्रुवारीला मोजणी होती. मात्र, अद्यापही मोजणी न झाल्याने हवेलीत मोजणी कार्यालयात नेमका काय प्रकार सुरु आहे, असं नागरिक आता विचारू लागले आहेत.
खातेदारांची ओळख परेड
हवेलीत मोजणीच्या ‘क प्रत’ साठी खातेदार शेतकऱ्यांना ओरिजनल ओळखपत्र घेऊन ताटकळत थांबावे लागत असल्याचा प्रकार मोजणी कार्यालयात सुरू आहे. खातेदार मोजणी अर्जासह, ओळखपत्र तसेच मोजणी फी चलन जोडत असतात. तरीही मोजणीच्या क प्रत साठी शेतकऱ्यांना ओळखपत्रासह ताटकळत ठेवणे अत्यंत दुर्दैवी व चीड आणणारे आहे.
याबाबत रवींद्र वाळके यांनी सांगितले की, मी सरकारी मोजणीची फी भरल्यानतंरही माझी उशिरा म्हणजे १७ डिसेंबर २०२३ ला मोजणी झाली. भूकरमापक सूरज रामटेके यांनी प्रत्यक्ष मोजणी करुन त्या मोजणीची ‘क प्रत’ १७ जानेवारी २०२४ ला तयार करून आणि त्यावर स्वाक्षरी करत वरिष्ठांच्या सहीसाठी प्रकरण ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर मला क प्रत साठी आजपर्यंत हेलपाटे मारावे लागत आहे. माझा भाऊ अर्जदार असल्याने त्यांना सोबत घेऊन मोजणी कार्यालयात गेलो असता संबधित क प्रत कार्यालयीन कर्मचारी राहुल पेंमरे यांच्या टेबलावरच असल्याचे आढळले. भूकरमापक यांच्या सहीनंतर हे प्रकरण एक महिना एकाच टेबलवर वेठीस ठेवल्याने कार्यालयीन प्रमुखांची सही होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मी शासकीय फी व्यतिरिक्त एकही रुपया देणार नसल्याने मोजणी होऊनही दोन महिने झाले तरीही मला अद्याप १३ फेब्रुवारी पर्यंत ‘क प्रत’ मिळाली नाही.
याबाबत हवेलीचे भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांना प्रलंबित मोजणीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, दरम्यानच्या काळात राज्यस्तरीय स्पोर्टसच्या स्पर्धा असल्याने व त्यामध्ये सर्वजण सहभागी झाल्याने वेळेवर म्हणजे मोजणीच्या तारखेला मोजण्या झालेल्या नाहीत. तसेच मोजणीची प्रकरणे वेळेवर निर्गत करण्यासाठी, कामकाजात सुधारणा करणेबाबत संबंधितांना आदेश देत आहे.