नसरापूर : भोर तालुक्यातील हातवे येथील एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गुंजवणी नदीच्या बंधाऱ्याखाली रविवारी (दि.22 सप्टेंबर) रात्री आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलीसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून आरोपीने खून केल्याची कबुली दिली आहे.
गणपत गेनबा खुटवड (वय-52 रा. हातवे खु., ता. भोर) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर स्वप्नील उर्फ बंटी ज्ञानोबा खुटवड (वय-30 रा. हातवे खुर्द ता. भोर) आरोपीचे नाव आहे. आरोपीस बुधवारी भोर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजवणी नदीपात्रामध्ये गणपत खुटवड आणि स्वप्नील खुटवड यांच्यात वादावादी सुरु असताना स्वप्नील शेलार हा त्यांच्यातील वाद मिटवण्याच्या उद्देशाने गेला असता आरोपी स्वप्नील खुटवड याने स्वप्नील शेलारला येथून शून्य मिनिटात येथून निघ नाहीतर तुझ्याकडे बघावे लागेल. अशी धमकी दिल्याने शेलार येथून निघून गेला होता. यानंतर आरोपी स्वप्नील खुटवड याने गणपत खुटवड यांच्या डोक्यात व डोळ्यावरील भुवईच्या वरती जखमा करुन खून केला आहे.
ज्या ठिकाणी मृतदेह आढळला त्या घटनास्थळी नातेवाईकांनी आजुबाजुस शोध घेतला असता गणपत खुटवड यांचा मोबाईल व चष्मा रोडच्या पश्चिम बाजुस नदीपात्राच्या उतारावर एकाच जागी सापडला. त्यापासुन काही अंतरावर विष्ठा केल्याचे दिसून येत होते. तसेच त्यांच्या पायातील एक चप्पल ही त्याच ठिकाणापासुन पाण्याच्या जवळ सापडली. यानंतर राजगड पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. परंतु घटनास्थळी आढळणाऱ्या सर्व वस्तू संशयास्पद दिसत होत्या. त्यामुळे नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला. यांनतर राजगड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली.
याप्रकरणी पोलिसांनी स्वप्निल खुटवड यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता गोपनीय बातमीदारांच्या मार्फत पोलिसांनी स्वप्निल खुटवडला खेडशिवापूर येथून ताब्यात घेतले. यावेळी स्वप्निल खुटवडने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनतर राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला.
अखेर स्वप्नील खुटवडणे सांगितला संपूर्ण खूनाचा घटनाक्रम…
यावेळी स्वप्निल खुटवड बोलला की, “मृत व्यक्ती गणपत खुटवड हे काळुबाई देवीचे देवऋषी असून त्यांचे रेशनिंगचे दुकान आहे. त्यांनी मला करणी केली आहे. त्यामुळे माझे रेशनिंग मिळण्याचे बंद झाले असून माझी आर्थिक प्रगती होत नाही. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबाबत राग होता. त्यामुळे मी त्यांचा पाठलाग करून हातवे बु. गावाजवळील गुंजवणी नदीच्या पुलाजवळ त्यांना अडवून डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यांचा खून केला व त्यांचा मृतदेह नदीपात्रात टाकून दिला. आणि हा अपघात वाटावा म्हणून त्यांची मोटार सायकल पुलावर सुरक्षा कठड्यालगत अडकवून ठेवली.” असे सांगून स्वप्निलने शेवटी गैरसमजातून खून केल्याचे कबूल केले.
या घटनेसंदर्भातील सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी, स्था.गु.शा. चे सपोनि दत्ताजी मोहिते, सपोनि कुलदीप संकपाळ, पो.स.ई अभिजीत सावंत, अंमलदार अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, राजु मोमीण, राजगड पोस्टे चे पोसई अजित पाटील, अंमलदार नाना मदने, अक्षय नलावडे यांनी केली आहे.
या प्रकरणी पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करीत आहे.