-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील एका व्यक्तीस ऊसतोड मजूर यांना पैसे द्यायचे आहेत, असे सांगून घेतलेली रक्कम परत न दिल्याने तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन बाळासो कोळपे (वय 38 वर्ष, व्यवसाय- शेती, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून 1) चंदर ताराचंद राठोड, 2) ताराचंद जयराम राठोड, 3) मुकादम अनिल ताराचंद राठोड, सर्व रा. पिंपर खेड, गोरखपुर तांडा,ता. चाळीसगाव, जि. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बबन कोळपे यांनी (दि. 04 जून 2023 पासुन ते दि. 01 ऑक्टोबर 2024) या काळात एकूण 10,95,000 रूपये संबधितास पाठवले. त्यानंतर त्यांनी मजूर कधी येणार आहेत, याबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मजूर त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले आहेत. तिकडे आल्यावर परत सहा महिने भेट होत नाही ते आले की कारखाना चालू होण्याचे अगोदर पंधरा दिवस आधी मजूर घेवून येतो, असे सांगितले.
त्यानंतर कोळपे पिंपरखेडा येथे गेले असता. त्यावेळी मुकादम अनिल राठोड यांने सांगितले की, दोन दिवसात मजूर घेवून जावू असे म्हणाला. त्यामुळे कोळपे यांनी तिथेच मुक्काम केला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी मुकादम अनिल राठोड यांस विचारले की, दोन दिवस झाले मजूर कधी येणार आहेत? तेव्हा त्याने सांगितले की, मजूर घरी नाही ते कोठे गेले आहेत माहीत नाही. त्यावेळी राठोड हा त्यांना म्हणाला की, तुम्ही अजून एक दिवस थांबा, मी तुम्हाला पाच मजूर भरून देतो. त्यामुळे कोळपे यांनी एक दिवस मुक्काम केला.
दुस-या दिवशी त्यांनी मजुरांबद्दल विचारणा केली असता ते म्हणाले की, सध्या मजूर कोणीच नाही आम्ही तुमचे पैसे परत देतो असे म्हणून चंदर राठोड यांने कोळपे यांना 1,00,000 रूपये अशी रोख रक्कम दिली. त्यानंतर मुकादम अनिल राठोड याने 40,000 रूपये फोन पे वरून पाठविले. त्यानंतर त्यांना वारंवार कोळपे यांनी मजूर देणे कामी दिलेले पैसे मागितले असता देतो असे म्हणत असून आज पर्यंत पैसे दिले नाहीत.
मुकादम अनिल राठोड यांनी वारंवार फोन करून ऊसतोड मजूर यांना पैसे दयायचे आहेत. त्यांना मी लवकरच घेवून येतो असे सांगून माझ्याकडून 10,95,000/- रूपये घेवून त्यातील 1,40,000/- रूपये परत दिले. बाकी राहिलेली 9,55,000/- रूपये मागितले असता आज देतो, उदया देतो असे म्हणून 1) चंदर राठोड 2) ताराचंद राठोड, 3) मुकादम अनिल राठोड यांनी पैसे घेवून फसवणूक केली म्हणून यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कदम हे पुढील तपास करत आहेत.