बारामती : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मोक्का लागलेल्या परळीतील वाल्मीक कराड याने ऊसतोडणी यंत्र (हार्वेस्टर) अनुदानाच्या आमिषाने बारामतीतील शेतकऱ्यांना फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामतीतील शेतकऱ्यांनी गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना हा सर्व प्रकार सांगितला.
हार्वेस्टर घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रत्येकी आठ-आठ लाख रुपये घेतले. अनुदानही दिले नाही आणि पैसेही परत केले नाहीत, अशी तक्रार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. सुप्रिया सुळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन करत या प्रकरणाची चौकशी करत शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने ऊसतोडणी मशिनसाठी देण्यात येणारे ४० टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगत वाल्मीक कराड याने ही फसवणूक केली असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बारामती तालुक्यातील तरडोली येथील शेतकरी व हार्वेस्टर मालक रामचंद्र विठ्ठल भोसले यांनी या फसवणूक प्रकरणाची माहिती सुप्रिया सुळे यांच्यासमोर माध्यमांना दिली आहे.
याबाबत बोलताना रामचंद्र भोसले म्हणाले कि, धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड हे निकटवर्तीय असून, ते तुम्हाला प्रत्येकी ३६ लाख रुपये अनुदान मिळवून देतील, त्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले होते. पैसे दिल्यानंतर कराडकडे शेतकरी अनुदान कधी मिळणार याची चौकशी करत होते. प्रत्येक वेळी पुढच्या महिन्यात होईल, अशी आश्वासने त्याच्याकडून दिली जात होती.
दरम्यान, लोकसभा निवडणूक काळात या शेतकऱ्यांनी बीडमध्ये धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या वेळी मुंडे हे हॉटेलात चौथ्या मजल्यावर तर शेतकरी पहिल्या मजल्यावर होते. त्या वेळीं कराड दोन पोलिस संरक्षकासह पाच- सहा गुंडांना घेऊन आला. शेतकऱ्यांना मारहाणीची घटना तेथे घडली.
याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, बारामती लोकसभा मतदारसंघातील हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारी बारामतीत शेतकऱ्यांनी भेट घेतली. या शेतकऱ्यांकडून हार्वेस्टर अनुदानासाठी मध्यस्थांनी आठ लाख रुपये घेतले आहेत. शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली असून जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना मी फोन केला आहे. ते शुक्रवारी (दि. १७) शेतकऱ्यांना भेटून चौकशी करतील, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.