इंदापूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यात देखील अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली आहे.
इंदापूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले, काल आपल्या इंदापूर तालुक्यात ठिकठिकाणी अनेक गावांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये अनेक शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे, तसेच शेतीची पिके जमीनदोस्त झाली.
अनेक शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके, तसेच बागांचे मोठे नुकसान झाले. विजेचे खांब, घरावरील पत्रे, बांधकाम याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, याबाबत अधिकाऱ्यांनाही लक्ष घालण्याबाबत सूचना केल्या आहेत.
शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसात मोठे नुकसान झाले आहे. त्यांना राज्य शासनाने तत्काळ मदत जाहीर करावी, अनेक गावांत विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. याठिकाणी देखील लवकरात लवकर वीज पुरवठा करून पाण्याची सोय करण्याच्या सूचना देखील हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या आहेत.